उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्वच शेतऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. काही शेतकऱ्यांना मोबाईलचे काहीच समजत नाही, तरीही प्रशासनाकडून फोटो अन् कागदपत्रांचा आग्रह धरणे चुकीचे आहे.जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. त्यापूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
चव्हाण म्हणाले, की पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तीन-चार वर्षांनंतर शेतकऱ्यांना खरीप पिकाचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. अधिकारी, पालकमंत्री यांना याबाबतची माहिती दिली आहे. मका, कांदा पिकांचेही नुकसान झाले असून, द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ऊसही अतिपावसाने आडवा पडल्याने कोंब फुटत आहेत. मात्र विद्यमान सरकारचे सत्ता स्थापनेचे वांदे अद्यापही सुटलेले नाही. त्यामुळे मदत केव्हा मिळणार? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यासाठी सत्ता स्थापनेचे नाटक संपवून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अन्यथा पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असेही ते म्हणाले.
कॉंग्रेसचे धरणे आंदोलन
दरम्यान, शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज कदम-पाटील, अग्निवेश शिंदे, लक्ष्मण सरडे, ऍड. दर्शन कोळगे, ऍड. विश्वजित शिंदे, सज्जन साळुंके, राजेंद्र शेरखाने आदी सहभागी झाले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

