कराड : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
काल, कराडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर निशाण साधतानाच अजित पवार व सुप्रिया सुळे यांना देखील लक्ष्य केलं होतं. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील’ असं विधान पाटलांनी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली? आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत” अशी फटकेबाजी आजी पवारांनी केली.
आमदार-कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून त्यांना गाजर दाखवावं लागतं
‘कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं’ असा खोचक चिमटा देखील अजित पवार यांनी भाजप नेत्यांना काढला आहे. तर, ‘आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो,’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हसन मुश्रीफ नगरमध्ये येऊन दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे डबे खातात’
- सुजय विखे व राम शिंदे यांचे अखेर मनोमिलन; स्थानिक आमदारांसाठी धोक्याची घंटा?
- बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील
- २६ नोव्हेंबरच्या कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा- बाळासाहेब थोरात
- ‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका

