🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान याला सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. यामुळे ईडीच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये कन्व्हर्ट केल्या प्रकरणी आता सईद खानला अटक झाली आहे. सईद खान हा या कंपनीचा संचालक आहे. खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत.
सईद खान हा गवळी यांचा निकटवर्तीय समजला जातो. गवळी यांच्या अनेक आर्थिक व्यवहारांशी खान याचा थेट संबंध असल्याची चर्चा आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील रहिवासी असलेला सईद खान हा मोठा कंत्राटदार आहे. तो गवळी यांचे निकटवर्तीय मानला जातो. कंत्राटदार असल्यानं कामाच्या निमित्तानं सईद हा भावना गवळी यांच्या संपर्कात आला. खान याच्या माध्यमातून भावना गवळी यांनी आजवर अनेक मोठमोठी कामं केल्याची शक्यता आहे. ईडीने सध्यातरी गवळी यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. पण सईद खान याच्या अटकेनंतर गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किरीट सोमय्या यांच्या आरोपाच्या अनुशंगाने गवळी या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. याच आरोपांच्या अनुषंगानं ईडीनं मागील महिन्यात मोठी कारवाई करत गवळी यांच्या विविध संस्थांवर धाडी टाकल्या. त्याच दिवशी परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं ईडीची कारवाई झाली होती. मात्र, वाशिम आणि परभणीमध्ये एकाच दिवशी पडलेल्या धाडींमध्ये कनेक्शन काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
नेमके प्रकरण काय आहे?
१९९२ मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला ४३ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. २००० सालापर्यंत हा कारखाना फक्त नावाला उभा होता. सुरू मात्र झाला नव्हता. त्यानंतर २००१ मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर २००२ मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यानंतर २००७ मध्ये राज्य शासनाने बालाजी पार्टीकल बोर्डला विकण्याची परवानगी दिली. तसेच भावना गवळी यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. हा कारखाना विकण्यासाठी जिल्हा उप निबंधकांने काही अटी शर्ती लावल्या होत्या.
यानंतर २०१० मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना भावना गवळी यांचे पीए अशोक गांडोळी यांचे ९० टक्के शेअर असलेल्या भावना ऍग्रो प्रायव्हेट लिमीटेडला विकण्यात आला. यासाठी रिसोड अर्बन क्रेडिट कॉ. बँकची १० कोटीची बँक गॅरंटी घेत शासनाची परवानगी न घेता विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याच व्यवहारात मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप हरीश सारडा यांनी ईडीकडे केला आहे. त्यानंतर ईडीने आज ही कारवाई करत भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचे व्यवहार सांभाळणाऱ्या सईद खान यांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच मंचावर
- केवळ रजनी पाटीलचं नव्हे तर ‘या’ नेत्यांची देखील काल झाली राज्यसभेवर बिनविरोध निवड
- सोमय्या चार वाजता टाकणार राजकीय ‘बॉम्ब’; नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार ? चर्चांना उधाण
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झालीये; सोमय्या पुन्हा कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
