🕒 1 min read
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस स्वबळावरच लढेल असं स्पष्ट केलं आहे. तर खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील मुंबईसह औरंगाबाद व कोल्हापूर महापालिकेतही स्वबळाबाबत तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीचं कारण देखील स्पष्ट केलं.
येत्या काळातील महापालिकांच्या निवडणूका, पक्षवाढीसाठीचे नियोजन, संघटन, पालकमंत्री व मंत्र्यांच्या नेतृत्त्वात कामांची आखणी याविषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर, ‘मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्राबाबत पवारासाहेबांची स्पष्ट भूमिका आहे. आघाडी असताना तिन्ही पक्षांनी एकत्रच निवडणुका लढायला हव्या.’ असं ते म्हणाले.
तर, ‘मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका तिन्ही पक्षांनी एकत्र लढावी अशी त्यांची भूमिका आहे. आता काँग्रेस नेते बोलत राहात आहेत, पण त्याबाबत अधिकृत चर्चा सुरु झालेली नाही. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं, पण काँग्रेसची भूमिका ते ठरवतील. पण आमची भूमिका स्पष्ट आहे.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- #JEE_2021 : जेईई ऍडवान्सड परीक्षा ३ जुलैपासून; तर विद्यार्थ्यांना ‘हा’ मोठा दिलासा
- ‘जो निवडून येतो तो म्हणतो, दादा आम्ही तुमचे; आम्ही पण या म्हणतो आणि सत्कार करतो’
- पासपोर्ट जप्तीवर वडेट्टीवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, मी स्वतः ईडीकडे जाऊन…
- शिर्डी साई संस्थानच्या ‘त्या’ फलकाला भूमाता ब्रिगेडने फासलं काळं !
- खा. प्रीतम मुंडे ऊसतोड कामगार पुत्राच्या मदतीसाठी मध्यरात्री आल्या धावून !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
