सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना २० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. तर अखेर आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सोमय्या हे पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीफ यांना मी तुरूंगात धाडणार आहे. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे,’ असा इशाराच सोमय्या यांनी दिलाय. यासोबतच, ‘मी अंबाबाईकडे प्रार्थना केलीये, जसा या शक्तीच्या मातेने राक्षसांचा वध केला होता, तसाच आता भ्रष्टाचारी राक्षसांचा वध करण्यासाठी मला ताकद दे,’ असं साकडं देखील त्यांनी देवीला घातलं आहे.
दरम्यान, सोमय्या करत असलेल्या आरोपांवरून काँग्रेस नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे भाजपावर घणाघात केला आहे. ‘किरीट सोमय्या यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे तरी सांगावे. महाराष्ट्रालाही कळेल की राज्यात सुडबुद्धीचं राजकारण होतंय’ असं आव्हानच सतेज पाटील यांनी दिले आहे.
‘मला वाटते किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही शहरात फिरण्याची काय आवश्यकता आहे? याचा अर्थ तुम्ही तिथे पब्लिसिटी स्टंट करत आहात. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करायची एवढंच काम सुरू आहे. सत्य थोड्या उशीराने बाहेर पडतं. परंतु तोपर्यंत कारण नसताना लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतो. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठीचच हे षडयंत्रं असल्याचा दावा पाटील यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच मंचावर
- केवळ रजनी पाटीलचं नव्हे तर ‘या’ नेत्यांची देखील काल झाली राज्यसभेवर बिनविरोध निवड
- सोमय्या चार वाजता टाकणार राजकीय ‘बॉम्ब’; नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार ? चर्चांना उधाण
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झालीये; सोमय्या पुन्हा कडाडले


