औरंगाबाद : आज रविवारी, (दि.१६) जालना रोडवर विमानतळाजवळ रस्त्याचे काम सुरू असतांना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेल्याची घटना घडली. पाईपलाईन दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अतिशय जीर्ण झाल्याने वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहे. पाईपलाईन फुटल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांवर जलसंकट घोंगावत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांना याची मोठी झळ सोसावी लागेल यात शंका नाही.
जालना रोडवर गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेची विविध प्रकारची कामे सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या कामांमुळे पाईपलाईन फुटण्यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.शहराला पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे वारंवार पाईपलाईन फुटुन पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाईपलाईन फुटने व तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली असतांना दुसरीकडे विविध अडचणींमुळे पाणी पुरवठा विभाग शहराची तहान भागवितांना त्रस्त आहेत. आजच्या या प्रकाराने चिकलठाणा परिसरात नळाला येणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. लवकर दुरुस्तीचे काम करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, मनपाने गांभीर्याने घ्यावे!
छोट्यामोठ्या पाईपलाईन फुटणे मनपासाठी नवे नाहीच. मात्र उन्हाळ्याच्या तीव्र संकटात जर हजारो लिटर पाणी जर वाया जात असेल तर याबाबत मनपाने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. अनेकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर हजारो लिटर पाणी वाया जाणे शहराला परवडणारे नाहीच.
महत्त्वाच्या बातम्या

