मुंबई – एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरू झालेले असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांमुळे रुग्ण पुरते हवालदील झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचां प्राम गमवावे लागल्यानंतर आज विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील 17 रुग्ण अडकले होते. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.सोबतच विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा, भांडुप, नाशिक येथील घटनांमधून राज्य सरकारने कोणताच धडा घेतला नाही असं त्यांनी म्हटले आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट यांची त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण – उदय सामंत


