दिल्ली : देशात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. देशातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यभरातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवत आहे. दिल्लीत देखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या गंभीर परिस्थितीमुळेच दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ गंभीर रुग्णांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या २४ तासांत २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त दोन तास पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. व्हेटिंलेटरदेखील नीट काम करत नाही आहेत. आयसीयू आणि एमजर्नसीमध्ये सध्या मॅन्यूअल व्हेटिंलेशन सुरु आहे. मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. ६० रुग्णांचा जीव सध्या सध्या धोक्यात असून तात्काळ मदतीची गरज आहे’. रुग्णालयाने तात्काळ ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णलायांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आणि ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. गुरुवारीदेखील याठिकाणी कोरोनाचे २६,१६९ नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनबाबत अमृता फडणवीसांकडून ठाकरे सरकारचे समर्थन
- देवदत्त पड्डिक्कलची दमदार खेळी ; केला ‘हा’ विक्रम आपल्या नावे
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’


