Share

“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला

Published On: 

मुंबई: निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती , प्रचार यंत्रणा , पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच. पंजाबातील निकाल डोळ्यात अंजन घालणारे आहेत. उत्तर प्रदेशातील जमिनीवर अखिलेश यादवांना हवेत तीर मारून चालणार नाही.अधिक गांभीर्याने त्यांना यापुढे निवडणूक लढवावी लागेल. प्रियंका गांधींनी आता कुठे लढाईला सुरुवात केली आहे. ती त्यांनी अर्धवट सोडू नये. पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे घडते तसेच काहीतरी होईल. पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून लगावला आहे.

…त्यांना घेऊन भाजप सत्ता राखू शकते-

भाजपच्या विजयाचे विश्लेषण थोडक्यात करायचे तर जिथे भाजपला पर्याय होता, तिथे मतदारांनी भाजपला पराभूत केले. पंजाबातील ‘आप’चा मोठा विजय हे त्याचे उदाहरण. पंजाबात काँग्रेसचे राज्य होते, ते त्यांनी स्वतःच घालविले. पंजाबच्या जनतेला ‘आप’च्या रूपाने एक पर्याय मिळाला व सत्ताधारी काँग्रेससह भाजप , अकाली दलाचा दारुण पराभव तिथे झाला . पंजाबात मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी , नवज्योतसिंग सिद्धू , अकाली दलाचे बादल पिता-पुत्र , काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर असे सर्व दिग्गज पराभूत झाले आहेत. लोकांना पर्याय मिळतो तेव्हा ते बदल घडवितात. मणिपुरात भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळाली, पण बहुमताचा आकडा गाठता आला नाही व 60 आमदारांच्या जागेत भाजपने 32 जागा जिंकल्या. त्यामुळे इतर बरेच लोक निवडून आले त्यांना घेऊन भाजप सत्ता राखू शकेल. असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

बाबूश मोन्सेरात यांचे चरित्र व चारित्र्य पाहता…

तसेच उत्तराखंडमध्ये काँग्रेस चांगली टक्कर देईल असे वाटले होते, पण 70 पैकी 46 जागा जिंकून भाजपने सत्ता कायम राखली. उत्तराखंडात काँग्रेसची दौड 18 वरच थांबली. गोव्यातील निकाल पाहता भाजपने जवळजवळ बहुमत गाठले आहे. चांगला जम असतानाही काँग्रेस 12 जागांवरच रखडून पडली. भाजपला 20 पर्यंत मजल मारता आली. पणजीत उत्पल पर्रीकर हे पराभूत झाले. बाबूश मोन्सेरात यांचे चरित्र व चारित्र्य पाहता पणजीची जनता बाबूश महोदयांना कायमचे घरी पाठवील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. गोव्यात आप , तृणमूल काँग्रेसने पसारा मांडला , त्याचा फायदा शेवटी भारतीय जनता पक्षालाच झाला. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले-

संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशात काय निकाल लागतात याकडे . योगी व मोदी यांना तिथे निर्विवाद कौल मिळाला आहे. या वेळीही ‘तीनशेपार’ अशी घोषणा होती. तीनशेपार आकडा गेला नसला तरी पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपने सगळ्यांना चकीत केले आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी व मित्रपरिवार 180 चा आकडा गाठेल असे चित्र शेवटपर्यंत होते. तसा प्रतिसाद त्यांना मिळत होता, पण यादवांना दीडशेचा टप्पा गाठता आला नाही. मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली. उत्तर प्रदेशात विकासापेक्षा जाती-पोटजातीचेच राजकारण जास्तच चालत आले आहे. या वेळी ‘हिजाब’ वादाच्या बरोबरीने जात-पातही चालविण्यात भाजप यशस्वी झाला. उत्तर प्रदेशातील गंगेच्या प्रवाहात शेकडो प्रेते वाहून जाताना लोकांनी पाहिली, पण त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले. असे राऊत म्हणाले आहेत.

…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते-

राकेश टिकैत हे शेतकऱ्यांचे नेते. त्यांनी सांगितले ,“लोकांच्या मनात भाजपविषयी राग होता, लोकांनी भाजपला मतदान केले नाही, तरीही ते कसे विजयी झाले? हे गौडबंगाल आहे.” भारतीय जनता पक्ष कसा काय विजयी झाला? हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लोकशाही व निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसे ते झालेच आहे. असा संशयही राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे मिशन राबवले त्यास ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देऊन उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा प्रचार जोरात केला. म्हणजे युक्रेनमधील अडकलेल्या मुलांचा आक्रोश आणि दमछाक यांचा वापरही राजकीय फायद्यासाठी कसा करावा हे भाजपकडून शिकावे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!