औरंगाबाद : महापालिकेच्या माध्यमातून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींची लसीकरण सुरु आहे. ज्येष्ठांसाठी महापालिकेकडे साठा नसल्याने ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबवण्यात आले होते. लसीचा साठा आणण्यासाठी पालिकेचे वाहन पुण्याला रवाना झाले होते. त्यानुसार सोमवारी (दि.१०) सकाळी अकरा वाजता पुण्यावरुन लसींचा साठा घेऊन वाहन परतले असून १३ हजार लसींचा साठा औरंगाबाद मनपास प्राप्त झाला आहे. त्यामुळे सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर तुफान गर्दी झाली असून लस घेण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केलेली आहे. १८ ते ४४ तसेच ४५ च्या पुढील नागरिकांचेही यातून लसीकरण सुरु झाल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. सुरुवातीला ११५ वॉर्ड तसेच इतर खासगी ठिकाणी लसीकरण सुरु होते. यासाठी शासनाकडे प्रत्येक आठवड्याला १ लाख लसींची मागणी केली होती. मात्र शासनाकडून २५ ते ३० हजार लसींचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेचा वेग मंदावला असून सध्या मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. यातही ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे अनेकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी पालिकेकडे १५०० कोविशिल्ड तर ३९०० कोव्हॅक्सिन उपलब्ध होत्या तर आज १३ हजार कोविशिल्डचा साठा प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
कामगार आणि व्यापारी वर्गाचेही लसीकरण रखडले
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे आणि व्यापारी वर्गाचे १९ एप्रिलपासून लसीकरण सुरु करण्यात आले. चिकलठाणा याठिकाणी ८ दिवस तर वाळूज या केंद्रावर दोनच दिवस लसीकरण चालले. यात केवळ ६५० कामगारांचे लसीकरण होऊ शकले. त्यानंतर लसींच्या निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे आठच दिवसात हे लसीकरण केंद्र बंद पडले आहे. यात पहिल्या टप्प्यात एकुण अडीच ते तीन हजार कामगारांना लसीकरण केले जाणार होते. लस उपलब्ध झाल्यानंतरच पुन्हा कामगारांते लसीकरण सुरु केले जाईल अशी माहिती मसिआ अध्यक्ष अभय हंसनाळ यांनी दिली. तसेच व्यापारी महासंघाने देखील सध्या लसीकरण बंद पडले असल्याची खंत व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींनी राज्यपालांना कार्यमुक्त करून मंत्रीपद द्यावे’, नवाब मलिकांचा टोला
- विधानसभा निवडणुकांत इतका वाईट पराभव का झाला? ; सोनिया गांधींनी व्यक्त केली चिंता
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- कट्टर विरोधक संभाजीराव काकडेंच्या निधनानंतर शरद पवारांनी व्यक्त केला शोक
- मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? मराठवाड्यातील व्हेंटिलेटरवरुन खासदार जलील यांचा प्रश्न


