औरंगाबाद : सिल्लोड – सोयगाव तालुक्यात जवळपास १५ ते २० दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी मका पीक करपत असून सोयाबीनची पाने, फुले गळताना दिसत आहेत. सोमवारी ( दि. ९) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निल्लोड – चिंचखेडा परिसरातील पावसाअभावी करपत असलेल्या पिकांची पाहणी केली.
यावर्षी तालुकभरात सुरुवातीला वेळेवर पावसाचे आगमन होते. त्यामुळे शेतकर्यांना मृग नक्षत्राचा पेरणी मुहूर्त साधता आला होता. त्यानुसार शेतकर्यांनी आपल्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या, परंतु त्यानंतर मध्येच पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील बर्याच शेतकर्यांना दुबार पेरणी संकटाचा सामना करावा लागला होता. कशीबशी रिमझिम पावसावर आतापर्यंत पीके तग धरून आहेत. परंतु आज ही शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी सोमवारी ( दि.९ ) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सिल्लोड दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील पीक परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही शेताच्या बांधावर जाऊन राज्यमंत्री व जिल्हाधिकारी यांनी पिकांची संयुक्त पाहणी केली. दरम्यान पाहणी नंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत तात्काळ पंचनामे करून पिकांच्या सद्य परिस्थितीबाबत शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एवढा पैसा, फौजफाटा तरी ‘ते’ का घाबरतात ?’; जयंत पाटलांची मोदी सरकार टीका
- शासनाची घरकुल योजना गरीबांसाठी आहे दारुवाल्यांसाठी नाही – दत्ता गोर्डे
- युवा सेना सचिव वरूण सरदेसाई मराठवाड्याच्या ‘विशेष’ दौऱ्यावर!
- बांधकाम सभापतींच्या प्रयत्नांना यश; वडोदबाजार पोलीस ठाण्याला मिळाले पेव्हर ब्लॉक
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर


