Share

पुणे मेट्रोच्या मुद्यावरून श्रेयवादाची लढाई सुरु; अजितदादांमुळेच मेट्रो रूळावर आल्याचा राष्ट्रवादीचा दावा

Published On: 

पुणे : पुण्यातील मेट्रो कधी सुरु होणार हा सवाल लाखो पुणेकरांना पडला आहे. आज या मेट्रोची ट्रायल रन पार पडली. बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली.

दरम्यान, लवकरच पुणेकरांच्या सेवेत मेट्रो येण्याची चिन्हे दिसू लागताच आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून मेट्रोचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रकाच्या माध्यमातून भाजपला देखील जगताप यांनी डिवचले आहे.

प्रशांत जगताप यांचे प्रसिद्धीपत्रक जसेच्या तसे

पुणे शहरातील वाढत्या वाहतुकीला सक्षम पर्याय असलेल्या पुणे मेट्रोची शुक्रवारी वनाझ ते आयडियल कॉलनीपर्यंतच्या ‘ट्रायल रन’ची यशस्वी चाचणी पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व खऱ्या अर्थाने पुणे मेट्रो रूळावर धावण्यासाठी बळ देणारे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या चाचणीचा शुभारंभ करण्यात आला. मेट्रो ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादांनी पुणे शहराला दिलेली अनमोल भेट असून, मी त्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा, पुणे मेट्रो आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आभारी आहे. आज फुकटचे श्रेय लुबाडण्याची सवय असलेल्या भाजपच्या वाचाळवीरांनी मेट्रोबाबत कितीही खोट्या वल्गना केल्या, तरी मेट्रोच्या इतिहासाची पुणेकर त्यांना आठवण करून देतील, यात काही शंका नाही.

पुणे महानगरपालिकेत २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला महापौर झाला. तत्कालीन महापौर सौ. राजलक्ष्मीताई भोसले यांच्या कार्यकाळात सर्वसाधारण समितीने पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता दिली. शहराची ही गरज ओळखून तत्कालीन आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आदरणीय अजितदादांनी पुणे मेट्रोच्या संदर्भातील राज्य सरकारचा सहभाग व गुंतवणूक या बाबींना मंत्रिमंडळात मान्यता दिली. केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमधील कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व खासदार आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री कमलनाथजी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगजी यांच्याकडून मंत्रिमंडळात हा विषय पारित करून घेतला. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, राज्यातील तत्कालीन आघाडी सरकार आणि केंद्रातील तत्कालीन ‘यूपीए’ सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून पुणे मेट्रोला मान्यता मिळाली.

पुणे मेट्रोला मान्यता मिळाल्यानंतर या कामांनी वेग घेतला. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर पुणे मेट्रोवर भाजपची वक्रदृष्टी पडली आणि जणू मेट्रो कामाला ग्रहण लागले. अंतिम मान्यता असलेला पुणे मेट्रोचा प्रस्ताव केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक दाबून ठेवला. नंतरच्या काळात आम्ही वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रस्तावाला मान्यता मिळाली. मी पुण्याचा महापौर असताना २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अर्थात, हा आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचाच प्रयत्न होता. तरीही पुणेकरांना मेट्रो मिळणार ही आमच्यासाठी समाधानाची बाब होती. मात्र, त्यानंतरही तत्कालीन पालकमंत्री गिरीशजी बापट यांच्याकडूनही या कामाला विलंब होत गेला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही पुणे मेट्रोकडे दुर्लक्ष केले. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या – तिसऱ्या टप्प्याची चर्चा होत असताना पुणे मेट्रोचे काम मात्र रेंगाळले होते.

परंतु, त्यानंतर सर्व चक्रे फिरली आणि पुणे मेट्रो रूळावर येऊन चाकांना वेग आला. राज्यात सत्ताबदल होऊन आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर गतिमान कार्य व दूरदृष्टी असलेल्या अजितदादांनी मेट्रोच्या कामाला चालना दिली. अजितदादांनी बळ दिल्याने अखेर पुणे मेट्रोचा यशस्वी चाचणीपर्यंत प्रवास झाला असून, शुक्रवारी अजितदादांच्या हस्ते त्याचा शुभारंभही झाला. अर्थात, लवकरच शहराच्या इतर भागातील नागरिकांनाही मेट्रो लवकरच दृष्टिपथास पडणार आहे आणि लवकरच मेट्रो प्रवासही घडणार आहे, हा विश्वास मी देतो.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा २००७ मध्ये पुणे मेट्रोचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आज, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेत असताना मेट्रोची यशस्वी चाचणी होत आहे. उद्या, सर्वसामान्य पुणेकर मेट्रोतून प्रवास करतील, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा महानगरपालिकेत सत्तेत असेल, असा विश्वासही मी या निमित्ताने देतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!