पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे कोविड काळातील अपयश झाकण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी जो गुणगौरव सोहळा केला, तो एकूणच हास्यास्पद आहे. कोविड काळात सर्वसामान्य पुणेकरांचे जितके हाल झाले तितके हाल राज्यातील इतर कुठल्याही शहरातील नागरिकांचे झाले नाहीत. नागरीक आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन हॉस्पिटलच्या दारात बेडसाठी मदत याचना मागत असतांना पुणे महानगरपालिका बेड शिल्लक असल्याचे खोटे डॅशबोर्ड रंगवून सर्व आलबेल असल्याचे भासवत होती अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केली आहे.
जगताप म्हणाले, या प्रकरणी उच्च न्यायालयाने सुद्धा महापालिकेवर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली होती, आणि आज त्याच महापालिकेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री कौतुक करून पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. जर योग्य नियोजन झाले असते तर आज हजारो पुणेकरांचे प्राण आपण वाचवू शकलो असतो.
राज्य सरकारने जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश देत , ५० टक्के निधी दिला व ५० टक्के निधी महापालिकेस देण्यात सांगितले तेव्हा ८ हजार कोटींची वार्षिक बजेट असणाऱ्या पुणे महानगरपालिकेने सपशेल हात वर केले व निधी देण्यास नकार दाखवत पुणेकरांना वाऱ्यावर सोडले, आज त्याच महानगरपालिकेचे केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री कौतुक करत आहेत. कित्येक पुणेकरांकडून अव्वाच्या सव्वा दराने हॉस्पिटल बिलांमध्ये लूटमार झाली, अनेक कुटुंब या महामारीत कर्जबाजारी झाली तेव्हा शासकीय नियमानुसार बिल आकारावे यासाठी पालिकेने कुठल्याही उपाय योजना केल्या नाही, आज त्याच महानगरपालिकेचे केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री कौतुक करत आहेत. लसीकरणाच्या नावाने जाहिरातबाजी करण्याचे काम सत्ताधारी भाजप करत असतांना, केवळ दीड रुपयांची सुई संपल्यामुळे २-२ दिवस लसीकरण केंद्रे बंद राहतात असे पुणे देशातील एकमेव शहर आहे. याची माहिती केंदीय आरोग्यराज्यमंत्र्यांना नसावी का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
जगताप म्हणाले, घरातील सदस्याच्या मृत्यू नंतर ऍम्ब्युलन्ससाठी ४ तास वाट बघावी लागली, अंत्यविधीसाठी १२-१२ तासांचे वेटिंग लागले, या गोष्टी पुणेकर कधीही विसरू शकत नाही. एकूणच सत्ता भाजपची , अन दुर्दैव पुणेकरांचे अशी परिस्थिती हे शहर गेल्या ४ वर्षांच्या काळात बघत आहे. आगामी निवडणुकांसाठी केवळ चमडी बचाव कार्यक्रम सुरू केला असून अश्या चमकू प्रशासकांचा पुणेकारांना कधीही अभिमान नव्हता आणि राहणारही नाही. संपूर्ण राज्यात सर्वात उशिरा रिकव्हरी होणारे शहर म्हणून राज्यात ओळख मिळवणाऱ्या पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कौतुक करणाऱ्या केंद्रीय आरोग्यराज्यमंत्र्यांना याबाबत कितपत ज्ञान आहे हा संशोधनाचा विषय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांत पाटलांची देगलूरच्या कार्यकर्त्यांना ऑफर
- अनिल देशमुखांच्या शोधासाठी केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय, पकडण्यासाठी परत छापेमारीची शक्यता


