🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून आता एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
सर्व बंडखोर आमदारांना आधी सुरतला आणि तिथून गुवहाटीला नेण्यामागे एका बांधकाम व्यवसायिकाचा मोठा हात असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय बांधकाम व्यवसायिक अजय आशर यांच्या नावाचा उल्लेख करत गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हंटलंय सामनात?
“मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना. अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात”, असं सामना अग्रलेखात म्हटलंय.
“एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते, पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे,” अशा खोचक शब्दांमध्ये शिवसेनेनं टीका केली आहे.
“मुळात महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार? महाराष्ट्रातून गुजरातेत पळवून नेलेले उद्योग या महाशयांनी पुन्हा परत आणायला हवेत. खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्व समावेशक विकास साधण्यासाठी ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मुख्यमंत्री व सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री आहेत, पण हे अजय आशरच ही संस्था चालवतील. कारण आशिष शेलार यांचाच दावा होता की, आशर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘फ्रण्ट मॅन’ आहेत. याबाबत विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्ब गोळे आहेत व ते नागपुरात फुटल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशाराही उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “भाजपच्या दबावाला भीक घालणार नाही”, ठाकरे गटातील या नेत्याचा घणाघात
- Sanjay Gaikwad | “प्रसाद लाड पाकिस्तानात जन्मले का? हे तपासावे लागेल”; संजय गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया
- Bacchu Kadu | “एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर…”, बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Ambadas Danve | अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोंड बंद करुन बसले ; अंबादास दानवेंची टीका
- Shambhuraj Desai | “बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

