मुंबई : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर विरोधक चौफेर टीका करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे. “संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. कारण पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, ते इथे नव्हतंच. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग बघणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली असेल. राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा,” असे पाटील म्हणाले.
“आरोप झाले, तर निर्दोषत्व सिद्ध करण्याचे अनेक घटनादत्त अधिकार आणि मार्ग आहेत. ते राहिले बाजूला, आरोप करणाऱ्याचं अतिशय असभ्य भाषेत चारित्र्यहनन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेनं राऊतांपासून सुरक्षित अंतर राखलं असावं”, असे देखील पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, यापलीकडे यात शिवसेना कुठेच नव्हती. त्यामुळे राऊत मध्ये-मध्ये बाळासाहेब, शिवसेनेचे नाव ओढून-ताणून घेत होते. उद्धवजी तर दूरच, पण ज्या आदित्य ठाकरेंना पर्यावरणाचा हवाला देत प्रकल्पावर कारवाई करायला राऊतांनी सांगितलं, तेही तिथे नसावे?”
“प्रयोग आणखी ‘नबाबी’ होण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घ्यायला हवी होती. कदाचित, नाशिकसारख्या दूरच्या ठिकाणांहून माणसं जमवता-जमवता ही जमवा-जमव जमली नसावी. असो. Sanjay Raut , गेट वेल सून!”, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :


