मुंबई : काही महिन्यांपूर्वी लसीकरणावरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. लस पुरवठा नसल्याने राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरण थांबविण्याची वेळ आली होती. लसीकरणाच्या वेगाच्या, बाधित लोकसंख्येच्या आणि एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राला लशी मिळत नाही आहेत, असा राज्य सरकारने केंद्रावर आरोप केला होता. तसेच महाविकास आघाडीचे नेते वारंवार केंद्रावर टीका करत होते.
मात्र, आता गुरुवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण होण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यातील ९ कोटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ६ कोटी ४० लाख म्हणजे ७० टक्के जनतेचा पहिला डोस, तर २ कोटी ९० लाख म्हणजे ३५ टक्के जनतेचे दोन्ही डोस पूर्ण झाले. दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती दिली.
राजेश टोपे यांच्या या माहितीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत राज्यात ७० टक्के लसीकरण पूर्ण’ झाल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ केंद्राकडून पुरेशी लस मिळत नसल्याची महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती. केंद्र सरकारवर खोटे आरोप केल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागायला हवी’ अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबविणे सोपी गोष्ट नाही. पण आतापर्यंत केवळ २१ टक्के भारतीयांचेच पूर्ण लसीकरण झाले आहे. जागतिक टक्केवारी ३७ टक्के आहे. त्यामुळे आताच उत्सव साजरा करून महामारी संपल्याचा आभास निर्माण करता कामा नये’, असे मिलिंद देवरा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अखेर नगर दौऱ्याचा मुहूर्त सापडला
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
- ‘त्या’ व्यक्तीला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?; ‘ते’ फोटो व्हायरल करणाऱ्यांवर अजितदादा चिडले
- ‘देशवासियांनी मेड इन इंडिया वस्तूच खरेदी कराव्यात’, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आवाहन
- ‘जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोवर शस्त्रे खाली ठेवू नका’, पंतप्रधान मोदींचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
