मुंबई : आगामी विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची पूर्वतयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ७ नोव्हें.रोजी दिल्लीत पार पडली. दरम्यान, बैठकीमध्ये भाजपाचे पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हंटले आहेत की,’भाजपा जनतेचा विश्वास जिंकेल, असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केले आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नक्की काय घडेल याविषयी बरेच तर्कवितर्क होते, पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या यावरच प्रामुख्याने चर्चा झाली. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत असे ठरले की, देशात १० लाख ४० हजार पोलिंग बूथ आहेत आणि २५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक बूथ स्तरावर भाजपाची कमिटी बनवली जाईल. तेथून पंतप्रधानांची ‘मन की बात’ जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल. एकंदरीत राष्ट्रीय बैठकीत राजकारण, सत्ता, मोदींचे भजन-कीर्तन याशिवाय काहीच घडले नाही’, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच पुढे ते म्हणाले की,’भाजपा हा आपल्या देशातील सगळ्यात जास्त निवडणूकग्रस्त पक्ष आहे. वर्षाचे ३६५ दिवस ते फक्त निवडणुकांचाच विचार करीत असतात. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने चर्चा झाली असती व पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समारोपाचे मार्गदर्शन केले असते तर देशाला दिशादर्शक ठरले असते. कार्यकारिणीत ‘महागाई’वर कोणीच गांभीर्याने बोलले नाही. पेट्रोल-डिझेल आजही शंभरी पार आहे. गॅस सिलिंडर १००० च्या वर गेले आहे. भाजीपाला सामान्य जनतेस परवडण्यापलीकडे पोहोचला. खाद्यतेलाने १५० चा आकडा पार केला. यावर कार्यकारिणीतील कोणाचेच हृदय का जळले नाही?’
दरम्यान, ‘भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी अत्यंत राष्ट्रहिताचे, राष्ट्रीय सुरक्षेचे, महागाईविरोधी असे विचार ठणकावून व्यक्त केले म्हणजे काय? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब त्यांनी फेकला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात चार-पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने १०० घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता-उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून’, असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर क्रांतीचे संतप्त प्रत्युत्तर, ‘माझी बहिण पीडित आहे आणि..’
- एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने रडीचा डाव खेळू नये-आ.विनायक मेटे
- ‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र


