मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखातून कोरोना लसीच्या चोरी संदर्भात भाष्य केले आहे. कलियुगात चोरी करायच्या वस्तूंची ‘व्हरायटी’ प्रचंड वाढली आहे. त्यात सध्याचे युग कोरोनाचे आहे. तेव्हा चोरी करण्याच्या वस्तूंमध्ये कोरोना लसींचीही भर पडली असेल तर आश्चर्यजनक काहीच नाही, असे राऊत म्हणाले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’वेदकाळातील गुरांची चोरी ते आताच्या कलियुगातील कोरोना लसींची चोरी असा हा देशातील चोरी आणि चोरांचा प्रवास आहे. चोरीचा हा मामला ‘हळूहळू बोंबला’ असे म्हणत मागील पानावरून पुढे अखंड सुरू आहे. कोरोनावर ‘वेलांटी’ नसली तरी निदान लसीची ‘मात्रा’ आहे आणि चोरीवर ‘वेलांटी’ असली तरी कोणतीच ‘मात्रा’ नाही, असे हे सगळे त्रांगडे आहे.’
पुढे ते म्हणाले की,’चोरी हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. तथापि, अपवाद वगळता चोरी कोणी जाणीवपूर्वक करीत नाही, हादेखील एक सर्वमान्य सिद्धांत आहे. आपल्या अनेक मसालेदार हिंदी चित्रपटांमधील हीरो लहानपणी ‘पापी पेट का सवाल है’ म्हणत ‘रोटी’ची चोरी करीत मोठेपणी ‘डॉन’ बनलेले दाखविले गेले आहेत. यावर उदात्तीकरणाचे आक्षेप घेतले गेले असले तरी चोरी कशाची करायची हे चोराची गरज आणि इच्छा यावरच अवलंबून असते, हे कसे अमान्य करता येईल? म्हणजे कोणी भाकरीच्या तुकड्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करतो तर कोणी चैन पूर्ण करण्यासाठी मौल्यवान चीजवस्तूंवर डल्ला मारतो. चोर आणि चोरी यांची ‘व्हरायटी’ अशी अनंत आणि अथांग आहे. मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणारी आहे. या शेपटाला आता आणखी एक धक्कादायक गोष्ट चिकटली आहे ती म्हणजे कोरोना लस.’
दरम्यान, हैदराबादमधील जामबाग प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना लसींचे तब्बल ६०० डोस चोरटय़ांनी लांबविल्याचे समोर आले आहे. फक्त लसीच नाही, तर तेथील दोन संगणक आणि इतर सामान यावरही चोरटय़ांनी हात मारला आहे. या लसींची साठवणूक ‘डोअर टू डोअर’ लसीकरण अभियानासाठी करण्यात आली होती, पण त्याआधीच चोरटय़ांनी त्यांचे ‘ओपन दी डोअर’ केले आणि पोबारा केला. आता या प्रकरणात पोलीस तक्रार झाली आहे आणि नेहमीप्रमाणे तपास सुरू आहे. या तपासात चोर आणि मुद्देमाल हस्तगत होईलही, पण कोरोना लसींची चोरी कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे का? ‘गरज ही शोधाची जननी असते’, असे म्हटले जाते. त्यानुसार ‘गरज ही चोरीला प्रवृत्त करते’ असेही म्हणता येईल. मात्र आता कोरोना लसीकरणाने देशभरात दीडशे कोटींचा टप्पा पार केल्याचे ढोल पिटले जात असताना आणि लसींची पुरेशी उपलब्धता असताना एक-दोन नाही तर ६०० डोस चोरण्याची ‘गरज’ कशामुळे भासली?, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…
- कोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”


