कोल्हापूर : २१ जुलै पासून सलग तीन दिवस कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.
चौथ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर उतरल्यानंतर पूर उतरण्यास सुरुवात झाली असून पूरग्रस्त भागांमधील पाणी ओसरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी दोन्ही जिल्यातील पूरस्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. ‘एक गोष्ट बोलली जाते, कर्नाटकात अलमट्टी धरण बनल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुलाचा धोका वाढलेला आहे. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा केली. धरणातील आवक आणि जावक याबाबत समन्वय ठेवला. कर्नाटकने प्रतिसाद दिला. तसं काम आजही सुरु आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
यासोबतच, ‘मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळच्या सरकारने एक समिती नेमली होती की खरोखरच अलमट्टीमुळे या दोन जिल्ह्यांना पूर येतो का, तर या समितीचा अहवाल आला.मध्ये अलमट्टीमुळे पूर येतो असं काही म्हटलेलं नाही. पण वरची जी काही धरणं आहेत, राधानगरी, दूधगंगा, वारणा, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत. कोयना धरण महत्त्वाचं, या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना होतो,’ अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : 28 जुलै रोजी फेरफार अदालतीचे आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार, घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्या’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द


