🕒 1 min read
मुंबई: बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर हल्ले झाले. हिंदू वस्त्या, मंदिरांची तोडफोड झाली. त्यानिमित्ताने त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्याकांनी आंदोलने केली. त्या आंदोलनांमुळे मुंबईतील कुण्या एका रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला. रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही. असे म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून रझा अकादमीवर टीका करण्यात आली आहे.
त्रिपुरातील घटनेवरून महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच. त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली. बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्यांची ‘बंद’ची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते. असा घणाघात आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुसलमानांत दंगली घडविण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. तुमचे राजकारण तुमच्या राज्यात. त्यासाठी महाराष्ट्र का पेटविला, हाच प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी चाबूक कडाडल्यासारखा विचारला असता. बाळासाहेबांनी लोकांना लढण्याचा, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा मंत्र दिला. आधी मराठी म्हणून व नंतर अखिल हिंदू समाज गलितगात्र होऊन ‘आलिया भोगासी’ अवस्थेत खितपत पडला असताना त्याला राष्ट्रसंजीवक मंत्र देऊन त्याच्यात नवचैतन्य निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे, हे विचारवंतांना आणि इतिहासकारांना मान्यच करावे लागेल. असे सामनातून म्हटले आहे. दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त सामनातून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे मिशन विदर्भ; भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांचा दौरा
- ‘…तर बाळासाहेबांनी एका दमात त्यांची नशा उतरवून पाच फूट जमिनीत गाडले असते’
- लहान मुलांच्या लसीकरणासाठी राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
- टीम इंडियामध्ये कोहलीच्या भूमिकेबाबत रोहितचे स्पष्टीकरण; म्हणाला..
- आम्ही राज्यातील हिंदूंची अवहेलना थांबविणार; सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांना टोला

