अमरावती : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यानंतर अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला होता तर परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई व इतर कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं.
मात्र, सणावाराच्या तोंडावर आर्थिक संकट शेतकऱ्यावर कोसळलं असतानाच झालेल्या नुकसानीचे काही ठिकाणी पंचनामेच होत नसल्यानं रब्बी पिके तरी कसं घेणार? बियाणांचा खर्च कसा उचलणार असे अनेक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत.
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले. यानंतर आता कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे आता कपाशीचे पीकसुद्धा वाया जात आहे. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी.’ अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.
तर, ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका नवनीत राणा यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेल्या दोन महिन्यात सक्रीय रुग्णसंख्येची टक्केवारी तिपटीने घटली ?
- १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने राज्यात औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – राष्ट्रवादी
- पायाभूत सुविधांसाठी निधीची अजिबात कमतरता पडू देणार नाही : यशोमती ठाकूर
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- राष्ट्रवादी काँग्रेसने पाडलं वंचित बहुजन आघाडीला खिंडार!


