जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी चार दशकांचा भाजपसोबत असलेला संसार मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सद्या फक्त राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार यावर जवळजवळ निश्चिती असतानाच खडसेंनी भाजपला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावला आहे. जामनेरमधील तब्बल ‘दोन बस’ भरुन भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागली असून शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला राम-राम ठोकून खडसेंची वाट धरली आहे.
आता, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजपचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दोन लक्झरी बसेस भरुन भाजप कार्यकर्ते पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या 200 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
त्यामुळे, भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांच्याच संकटात मोठी भर पडली आहे. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर आदी उपस्थित होते.
जे हौशे-गवशे आहेत तेच जातील – गिरीश महाजन
दरम्यान, कालचं गिरीश महाजन यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या ओघावर भाष्य केलं होतं. “पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला होता. तर, “राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील” असं ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने खळबळ!
- कर्ज आणि चलन बाजाराच्या वेळांमध्ये बदल, आरबीआयचा मोठा निर्णय…
- महाराष्ट्राची अवस्था ‘आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना’ अशी करण्याचे षडयंत्र – पेडणेकर
- …मग मेधा कुलकर्णींना का डावललं ? छगन भुजबळांचा चंद्रकांतदादांना खोचक सवाल
- आमचं सरकार पाच वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार; प्राजक्त तनपुरेंचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

