मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करत निशाना साधला आहे. केंद्रातले भाजप सरकार म्हणे आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आज खरेच उरले आहे का? जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करून रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र गाडीखाली चिरडून मारतात. पुन्हा शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱ्या प्रियंका गांधीना तुरुंगात डांबले जाते. बेरोजगारांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. विद्यापीठांत मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला आहे. बेडय़ांत जखडून टाकला आहे. कसली आहे आझादी? कसले स्वातंत्र्य उरले आहे? तेव्हा आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ढोंग का करता? असा प्रतिसवाल सामनातून करत संजय राऊत यांनी केंद्रावर ताशेरे ओढले आहेत.
या ढोंगाचा बुरखा फाडण्याचे काम आता एकत्रितपणे करायला हवे. एकजुटीची वज्रमूठ हीच लढणाऱयांची ताकद आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने हीच एकजुटीची ताकद दाखवली आहे! महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भारतीय जनता पक्षाचा बुरखाच फाटला आहे. शिवसेनेचे विचार व शिवसेनेच्या भीतीने ते भुई थोपटत सुटले आहेत. एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाच्या बाबतीत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत ‘मराठी कट्टे’ सजवीत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थ व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो हे आपल्याला माहित आहे –मोहन भागवत
- चेन्नई की कोलकाता कोण जिंकणार ट्रॉफी?, दोन्ही संघात आज होणार काटे की टक्कर
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- ‘मी एक चांगला वडील नाही…’, शाहरुखने केले कबूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

