मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मंत्री ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. या पर्यटनस्थळांना आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.
राज्य शासनामार्फत कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत बीच शॅक धोरण मंजूर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वर्सोली समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे. कोकणातील इतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचाही या धोरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. सिंधुदूर्गमध्ये हॉटेल ताज ग्रुप गुंतवणूक करत असून चिपी विमानतळही लवकरच सुरु होत आहे. आता रायगड जिल्ह्यातील ३ पर्यटनस्थळांना ब वर्गाचा दर्जा देण्यात येत असून या पर्यटनस्थळांना या दर्जाप्रमाणे सोयी-सुविधा व निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रातील शिवकालिन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी, १५० वर्षे जुनी ब्रिटीशकालीन वेधशाळा, श्रीकनकेश्वर, श्रीसिद्धेश्वर, श्रीरामेश्वर, श्रीबालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदीर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदीरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदीर, हिराकोट किल्ला व तलाव, खांदेरी व उंदेरी किल्ले इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारपासून राष्ट्रवादीची संवाद यात्रा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बीडमधून प्रारंभ
- पंतचे दमदार अर्धशतकटीम; इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- तिचे अर्धे आयुष्य न्यायाच्या प्रतिक्षेत, उद्ध्वस्त घरांवर दबंगांचे इमले

