उस्मानाबाद : जिल्ह्यातील अतिमहत्त्वाचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील योजनांच्या माध्यमातून भरीव निधी मिळू शकतो. टेक्निकल टेक्स्टाइल हब, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठकीसाठी वेळ देण्याची मागणी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत पत्रात म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ ऑगस्ट, २०१९ मध्ये एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कौडगाव औद्योगिक वसाहतीत टेक्निकल टेक्स्टाइल हब उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. तो प्रस्ताव तयार झाला आहे. परंतु एक वर्षापासून त्यात प्रगती झाली नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जात नाही. जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौडगाव येथे टेक्निकल टेक्स्टाइल हब उभारण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणे आवश्यक आहे.
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग जलदगतीने पूर्ण होण्यासाठी ५० टक्के निधी देण्याचे राज्य सरकारने मान्य केले होते. परंतु वारंवार विनंती करूनही राज्य सरकारच्या ५०% वाट्याचे संमतीपत्र रेल्वे बोर्डाकडे सादर केले नाही. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन अंतर्गत प्रकल्पांची संख्या ६८३५ वरून ७४०० पर्यंत वाढवली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील ७ टीएमसीचे काम पूर्णतेसाठी ३६०० कोटींची गरज आहे.
निधी उपलब्धतेसाठी प्रकल्पाचा समावेश नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन योजनेत करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करुनही विकासाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने लोकप्रतिनिधींना आपल्यासोबत बैठकीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही बंद खोलीत काय केलं आम्हाला काय माहीत?, जितेंद्र आव्हाडांचा अमित शहांना टोला
- मार्चपूर्वीच निदेशकांना रखडलेल्या नियुक्त्या मिळणार : राज्यमंत्री बच्चू कडू
- माता रमाई आंबेडकरांचे मुंबईत स्मारक उभारणार – रामदास आठवले
- बाळासाहेबांची खोली म्हणजे बंद खोली नाही, आमच्यासाठी ते मंदिर – संजय राऊत
- सिल्लोड शहरातील शेकडो कुत्र्यांना त्वचारोग, उपाययोजनांची गरज


