बीड : बीड आणि जालना जिल्ह्यात बनावट लग्न लावून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. परंतू काही महाभाग अजुनही यासारख्या प्रकाराला बळी पडत असल्याचे दिसत आहे. बीडच्या गेवराईत असाच एक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका स्वत:ला प्रतिष्ठित समजणाऱ्या व्यक्तिला एका वधुने नऊ लाखांना गंडवले आहे. या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली आहे. लुबाडलेल्या पतीच्या तक्रारीवरून गेवराई ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, गेवराईतील एका ५१ वर्षीय व्यक्तिच्या बायकोचे दोन वर्षापूर्वी आजारपणामुळे निधन झाले. त्याला दोन विवाहित मुली आणि एक विवाहित मुलगाही आहे. नातवंडाने भरलेल्या परिवारातील त्या आजोबाला उतारवयात दुसरे लग्न करण्याची हुक्की आली. घरात ‘सुख’ लाभत नसल्याने औरंगाबाद येथील एका वधु-वर सुचक केंद्रात लग्नासाठी नोंदणी केली. तिथे ज्योती भाऊसाहेब शेळके (रा. शिऊर बंगला, ता.वैजापूर जि. औरंगाबाद) हिच्याशी त्याची ओळख झाली.
त्यानंतर ज्योतीची आई कमलबाई, भाऊ सागर भाऊसाहेब शेळके, बहीण मिना छगन मोईन व छगन मोईन (दोघे रा. चोर वाघलगाव, ता.वैजापूर) तसेच ज्योतीची दुसरी बहीण स्वाती सोमनाथ मिसाळ तिचा पती सोमनाथ मिसाळ (दोघे रा. देवगड, जि.नगर) हे गेवराईला आले. त्यांनी घरी जाऊन लग्न जमवले. ज्योती शेळके हिच्याशी लग्न करण्याला तो तयार झाला. पण लग्नानंतर काही दिवसांतच ज्योतीच्या नातेवाईकांकडून व्यक्तीला पैशाची मागणी होऊ लागली.
त्यानंतर २३ फेब्रुवारीला तो कामासाठी बाहेरगावी गेल्यावर त्याच्या दुसऱ्या पत्नीने घरातील सोन्याचे पाच लाखांचे दागिने, रोख दीड लाख रुपये, दोन लाख रुपये किमतीच्या साड्या व इतर कपडे असा एकूण आठ लाख ७० हजारांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. ही गोष्ट माहिती होताच फसवल्या गेलेल्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत दुसऱ्या पत्नीसह तिच्या नातेवाईकाविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, या हौशी नवरोबाची शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ!
- मोठी बातमी : राज ठाकरे अॅडमिट असल्याने आजच्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर
- नाभिक समाजाकडून ठाकरे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
- प्रेयसीच्या छळाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या
- पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल, देवेंद्र फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध


