पुणे : ‘कोरोना’च्या संभाव्य ‘तिसऱ्या लाटे’ची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांबरोबरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी राखून ठेवण्यात आला आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीतपणे होईल. पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना सरसकट सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करता कामा नये, असे सांगून रेमडेसिवीरबाबतीत गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करुन दोषी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याबरोबरच काही रुग्णालये बिला साठी मृतदेह अडवून ठेवल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवरही कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी स्वतःहून नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. ऑक्सिजन युक्त व व्हेंटिलेटरयुक्त उपलब्ध खाटा, उपलब्ध लस याविषयी समन्वय ठेवून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना वैद्यकीय सेवा सुविधा अपुऱ्या पडू नयेत, याची दक्षता घेऊन काटेकोरपणे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शासकीय यंत्रणेला दिले. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिवीर इंजेक्शन आदी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ज्यादा बिल आकारत रुग्णांची फसवणूक करणाऱ्या ‘या’ १४ रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीसा!
- चीन्यांमुळे आणखी एक संकट; अनियंत्रित रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता !
- तामिळनाडूमध्ये स्टॅलीन यांच्या मंत्रिमंडळात गांधी, नेहरूंना संधी !
- ‘अजितदादा धडाडीचे नेते पण उपमुख्यमंत्री झाल्यावर ते का बदलले हे मला समजत नाही’
- ‘ज्येष्ठ नेते मराठा आरक्षणाच्या निकालावर साधं एक स्टेटमेंटही का देत नाहीत ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
