औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार चोरट्यांचा येथील तरुणांच्या सतर्कतेमुळे डाव फसला व त्यांनी दुचाकी सोडून देत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र परिसरातील दुसरी दुचाकी चोरीला गेल्याने ती दुचाकी याच चोरांनी लांबवली असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.
गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवर तीन व्यक्ती पिरबावडा येथील बसस्थानकाच्या दिशेने आजूबाजूला पाहून गाडी थांबवत थांबवत जात होते. हा प्रकार एका तरुणाने बघितल्यानंतर आपल्या मित्रांना फोन लावला. या दरम्यान चोरट्यांनी बसस्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीचे शटर उचकवले परंतु ते आत घुसण्याच्या अगोदर हे दोन तीन तरुण तेथे आल्याने चोरट्यांचा डाव फसला. या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता या तरुणांना चाकूचा धाक दाखवत दुचाकी सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार येथील पोलिस कॉन्स्टेबल संतोष जिबोले हे मनोज वाकीकर, सिद्धार्थ वक्के यांच्यासह हजर झाले. यावेळी चोरट्यांनी सोडलेली पिशवी व दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
सोबत आणलेली दुचाकी सोडली अन् दुसरी पळवली
या दरम्यान पिरबावडा-मारसावळी फाटा येथील गोरख विठ्ठल पाटोळे यांची हिरो होंडा स्लेंडर ही दुचाकी चोरी गेल्याचे कळले तेव्हा याच चोरट्यांनी दुचाकी पळवली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. चोरट्यांनी सोडलेली दुचाकी पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी गावातील तरुण त्या दुचाकीजवळ पोलिसांची वाट पाहत थांबले होते. या दरम्यान चोरट्यांनी पाटोळे यांची दुचाकी चोरत पळ काढला अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बाबत वडोद पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ डी डी निकम हे करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिताली राजने रचला विक्रम ; 10,000 धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकांचा सलग चार दिवस लॉकडाऊन…
- साबरमती आश्रमातून आज दांडी यात्रेला सुरुवातात, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा
- सचिन वाझेंची अखेर बदली झाली; आता ‘या’ विभागात पदभार स्वीकारणार
- क्रिकेट जगतातील सगळ्यात वादग्रस्त आऊट; ‘या’ व्हिडीओची क्रिकेट विश्वात चर्चा


