मुंबई : राज्यातील सत्ता नाट्याचा शेवट एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाने झाला असला तरी याबाबतची कायदेशीर लढाई अजूनही संपलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी यांना आता राज्यपालांसमोर बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड देखील करण्यात येणार आहे. मात्र विधानसभेच्या होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे .
२ आणि ३ जुलैला होणार हे अधिवेशन आता ३ आणि ४ जुलै २०२२ रोजी होणार आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी हे अधिवेशन बोलावलं आहे. उद्यापासून हे अधिवेशन सुरू होणार होतं. पण आता अधिवेशनाची तारीख पुढे ढकलून ३ आणि ४ जुलै करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन रविवार दिनांक ३ जुलै आणि सोमवार दिनांक ४ जुलै २०२२ रोजी बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असून अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार दिनांक 2 जुलै २०२२ रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवड रविवार दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सभागृहात होणार आहे. विधानसभेच्या सदस्यांना या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान , विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतलं जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदी कुणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

