अहमदनगर/ऋषिकेश घोगरे – महापालिकेतील स्थायी समिती सभापती तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नगरच्या शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली होती. सुमारे वर्षभरापासून गटबाजीत विखुरलेली शिवसेना पुन्हा एकीच्या दिशेने प्रवास करू लागली असून, दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी जुन्या-नव्या नेत्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न विक्रम राठोड यांनी केला. तर काल दुपारी संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत एकत्र बैठक घेऊन यापुढे आरोप-प्रत्यारोप बंद करण्याचे सांगण्यात आले. पुढचा महापौर शिवसेनेचाच, असा नारा देत पक्षशिस्तीचे धडे देण्यात आले आहे.
नगर शिवसेनेत उफाळून आलेल्या वादावर पडदा टाकण्यात अखेर विक्रम राठोड व वरिष्ठ पातळीवर यश आल्याचे दिसू लागले आहेत. काल शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचे मनोमिलन करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात आले व त्यामध्ये यशही येताना दिसत आहे. यावेळी भाऊ कोरगावकर म्हणाले, काही कारणांमुळे पक्षात थोडीशी नाराजी होती. त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी मी, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, विक्रम राठोड या सर्वांनी बैठक घेतली. विक्रम राठोड यांनी प्रत्येक नगरसेवकासोबत संवाद साधला होता. तसेच आजच्या बैठकीत एकमेकांबद्दल जे क्लेश होते, ते दूर झाले आहेत. आता सर्वच लोक एकत्र दिसतील. आपण आपापसात भांडतोय, हे सर्वांना समजले आहे. त्यामुळे येथून पुढे तसे काही दिसणार नाही.
यावेळी पक्षशिस्त मोडणाऱ्यांना आता पक्षाबाहेर जावे लागेल, असा सज्जड इशाराही देण्यात आला असून पुढचा महापौर शिवसेनेचाच करायचा, असा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीला संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, युवासेनेचे विक्रम राठोड, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, ज्येष्ठ शिवसैनिक अंबादास पंधाडे यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे
- नाथाभाऊंनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही; चंद्रकांत पाटलांची भावनिक साद
- ‘प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल अनुद्गार काढणे योग्य नाही’
- महाराष्ट्राने उदयनराजेंचा अपमान सहन केला याचं आश्चर्य वाटतं : निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

