मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिनाभरापासून जोर धरू लागली आहे. त्यातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होऊ शकते. तसंच लोकल प्रवासाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठे विधान केले आहे. ‘ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना लोकल, बस, एसटी किंवा दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी या मताचा मी आहे. तशी मानसिकता आमच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होईल.’ असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ मॉल, दुकानं आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी जर दोन डोस घेतले असतील तर त्यांना अधिक मुभा कशी देता येईल, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होईल,’ असे देखील अस्लम शेख यांनी सांगितले आहे.
खरतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असतानाही राज्य सरकारने लादलेले निर्बंध कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार अक्षरश: वैतागले असून हे निर्बंध तातडीने शिथिल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. निर्बंधांना न जुमानता व्यवहार चालू करण्याशिवाय आता पर्याय नाही, अशी भावना जनमानसात वाढीस लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधी काँग्रेस चालवण्यास असमर्थ; पत्रकार परिषद घेण्यापेक्षा ते तक्रार का नाही करत ?’
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण


