मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
उद्याच्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत. हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात आले आहेत.
एसटी च्या स्थानिक प्रशासनानं तशी माहिती घेऊन त्या- त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवायची की नाही याबाबत आढावा घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही निर्देश आहेत. ज्या रस्तावर, मार्गावर आंदोलन होत आहे अथवा होणार आहे अशा मार्गावर वाहतूक करू नये, असे निर्देश आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे.
या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला पाठींबा द्यायला हवा होता – रामदास आठवले
- शेतकरी आंदोलन: राजू शेट्टी वाहत्या गंगेत हात धुवून घेतायत?
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- पोलीस आणि सरकारवर सँडल गायब केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?

