टीम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसाने सोयाबीन, कापुस, मका, ज्वारी, उडीद, मुग, यासह इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासन मात्र पंचनाम्याच्या नावाखाली वेळ काढूपणाचे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना कमालीची आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सोयाबीन-कापुस नुकसान भरपाईसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने “राडा आंदोलन” करण्यात येणार आहे.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी थेट 50 हजार रुपये नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तसेच पिकविम्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पिकविमा मंजुर करण्यात यावा. या मागण्याकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर “राडा आंदोलन” करण्यात येणार आहे.
या आंदोलनातून स्वभिमानीत घरवापसी केलेले रविकांत तुपकर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्याच आक्रमकतेने रस्त्यावर उतरताना पाहायला मिळणार आहेत. तर राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करत राज्यभर ‘जायंट किलर’ म्हणून ओळख मिळवणारे आमदार देवेंद्र भुयार हे देखील आमदार झाल्यावर प्रथमच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘चळवळ टिकली पाहिजे’ ही साद दिल्यानंतर हे संघटनेचे पहिलेच आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर परतीच्या पावसाने राज्यातील शेतक-यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. या शेतक-यांना न्याय देण्यासाठी शासनाने ५ नोव्हेंबर पर्यंत तातडीने मदत न दिल्यास ५ नोव्हेंबरपासून राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रसंगी कायदा हातात घेऊन संपुर्ण राज्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे. अशी हाक देखील राजू शेट्टी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1189514472479584256?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1189502170569138177?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1189499660982816773?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

