मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत काल मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत देखील लॉकडाऊनबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती आहे. सध्या राज्यात कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणावरून होणाऱ्या राजकारणावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात एक दिवसाला 6 लाख व्हॅकसीन लागतात आणि एका आठवड्यात 40 लाख हव्या असतात तर, महिन्याला एक कोटी लागणार आहे. या विषयात कुणालाही राजकारण करायचं नाहीये. 25 वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो. मी काय फार मोठा माणूस नाही. पण संक्रमण वेगाने पसरतंय. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मदत करावी. अस म्हणत राजेश टोपे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हळहळले. मुंबई आणि पुणे येथे व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज आहे. ऑक्सिजनची कमतरता भारत सरकारला सांगून दूर करावी, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे अध्याप 1200 मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ!
- मोठी बातमी : राज ठाकरे अॅडमिट असल्याने आजच्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर
- नाभिक समाजाकडून ठाकरे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
- प्रेयसीच्या छळाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या
- पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल, देवेंद्र फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध


