पुणे : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर अखेर १६ नोव्हेंबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नारळांची खास आरास करण्यात आली. अंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज.
या श्री उमांगमलजांचा जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला होतो. गाणपत्य संप्रदायात या दिवशी मोरयाला नारिकेला अर्थात नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत धार्मिक कार्यक्रमांसह नारळांची आरास करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
अशोक गोडसे म्हणाले, देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविण्यात आले. त्यांना श्री गजानन असे म्हटले आहे. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात भगवान श्री गणेशांचे नाव आहे उमांगमलज.
ते पुढे म्हणाले, उमा म्हणजे देवी पार्वती. तिच्या अंगावरील मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला. असा याचा शब्दश: अर्थ. हा जशाला तसा लागू पडतच नाही. देवी पार्वतीच्या अंगावर पुतळा म्हणण्याइतका मळ असेल तरी कसा? तर लक्षात घ्यायला हवे की या सर्व कथा अध्यात्माचे निरूपण करण्यासाठीच असतात. आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे. तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे. हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज असे म्हणतात.
मनाचे प्रतीक आहे फुल. तर बुद्धीचे प्रतीक आहे नारळ. नारळाला जशा बुच्या असतात, त्यात करवंटी असते, त्यावर तीन डोळे असतात, तशीच रचना आपल्या डोक्याची आहे. त्या डोक्याचे, त्यात असणा-या बुद्धीचे प्रतीक आहे नारळ. भगवंताला मन आणि बुद्धी समर्पित करण्याचे प्रतीक फुल आणि नारळ आहे. बुद्धीवरील मळ झटकून त्या शुद्ध बुद्धीला श्री गजानन चरणी नतमस्तक करण्याचा हा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- स्वत:च्या ताकदीवर सत्ता चालवता येत नसेल तर जोडतोड करून सरकार आणलंच कशाला? : पाटील
- ‘दोन दिवसांत शनिवार वाडा उघडा अन्यथा…’ ; ब्राह्मण महासंघाचा आक्रमक इशारा
- ‘हेच मंत्री स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील’ : नारायण राणे
- आता धर्म पाहून प्रेम करायचे का? जीशान अय्यूबचा थेट सवाल
- ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला; मध्यप्रदेशात येणार कडक कायदा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

