🕒 1 min read
शिर्डी : काही पौराणिक दाखले देत असताना कीर्तनकार इंदोरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील. त्याचं इतकं का भांडवल करताय? किती वाद घालणार? त्याने काही खून केला नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर महाराजांवर दिलीय. समाजप्रबोधनात इंदोरीकरांचं मोठं योगदान आहे, असही त्यांनी म्हटलंय. तर जगा आणि जगू द्या, असं आवाहनही त्यांनी केलयं.
कीर्तनकार इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, अजूनही त्यांच्या वक्तव्यावरुन तृप्ती देसाई आक्रमक असून आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना त्यांनी नोटीस पाठवली आहे. यावर आता सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर यांच्या समर्थन केल आहे.
“इंदोरीकरांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी आपल्या प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला करत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे त्यांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरु ठेवावं”, असा सल्ला सिंधूताईंनी इंदोरीकरांना दिला आहे. याशिवाय टीका करणाऱ्यांनाही महाराजांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा, असा सल्ला सिधूताईंनी दिला.
दरम्यान आता इंदुरीकारांचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंदुरीकर यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले आहे, असा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. या संदर्भात चौकशी करुन दोन दिवसात अॅट्रोसिटी संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी दिले आहे.


