🕒 1 min read
ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी स्वपक्षाविरोधातच बंड पुकारलं होत. यानंतर शिवसेनेला अजूनही धक्क्यांवर धक्के बसत आहेत. मात्र एवढं सगळं घडून आम्ही आजून शिवसेनेतच आहोत असं शिंदे वारंवार सांगत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून आषाढी एकादशीची शासकीय महापूजा कोण करणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. पण या चर्चांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या हस्ते पूजा होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्ष आणि सदस्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना महापूजेसाठी आमंत्रित केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पूजेचं निमंत्रण दिलं आहे. १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला.
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
