मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणाऱ्या पेट्रोल-डिसेलच्या दरामध्ये दररोज वाढ होत आहे. त्यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
भारतामध्ये एव्हिएशन टर्बाईन फ्युएल- एटीएफ म्हणजेच विमानाचे इंधन ज्या दरांत विमान वाहतूक कंपन्यांना विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर ३३ टक्क्यांनी अधिक असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने सत्ताधारी भाजपा सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रामध्ये सत्तेत आलेल्या भाजपाने ‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?’ असे सवाल निवडणुकींच्या प्रचार सभांतून उपस्थित करत सत्ता मिळवली. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोलच्या दराने साठी ओलांडल्यानंतर भाजपने आंदोलने केली होती, अशी आठवण करुन देत शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.
पेट्रोल-डिझेलची दररोज होणारी दरवाढ आणि त्यामुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे आता असह्य करून सोडले आहे. हा हा म्हणता पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरीचा आकडा ओलांडला आणि इंधनाच्या सलग होणाऱ्या दरवाढीमुळे साहजिकच मालवाहतुकीचा खर्च वाढून सर्वच क्षेत्रांत महागाईने आपले हातपाय पसरले. गेल्या तीन आठवड्यामध्ये तर तब्बल १६ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱ्या या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे. मागच्या आठवड्यात रविवारपर्यंत तर सलग चार दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आणि इंधनाच्या दरांनी भलताच उच्चांक गाठला, असं राऊत म्हणाले आहेत.
विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंधन महाग झाले. एव्हीएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) म्हणजेच विमान प्रवासासाठी लागणाऱ्या हवाई इंधनाच्या दरांना मागे टाकून बाईक व कारच्या इंधन दरांनी नवीन विक्रम नोंदविला आहे. हवाई वाहतुकीच्या इंधनाचा दर एका लिटरला ७९ रुपये आहे आणि रस्ता वाहतुकीच्या वाहनांचा इंधन दर १०५ ते ११५ रुपयांहून अधिक झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दर हवाई इंधनापेक्षा थोडेथोडके नव्हे, तर तीस टक्क्यांनी महाग झाले आहे, असं राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
- त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल
- सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?
- कश्मिरा शाह, सुनिता आहुजा यांच्यात पुन्हा वाद..?


