मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडमधील काही लोकांशी उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीबाबत चर्चा केली. उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण चांगलचं तापू लागलं आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांसह त्यांना भेटायला गेलेल्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर देखील सामना अग्रलेखातून टीका केली आहे.
‘योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले.
‘ट्रायडण्ट’च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली. योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे. योगी महाराज आता सिने उद्योगात उतरणार असल्याने त्यांनी अशा विषयाकडे मनोरंजनाचा भाग म्हणून पाहायला हवे.’ अशा शब्दांत शिवसेनेनं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून योगींवर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय…
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
‘औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविणार’ खा. जलील यांचा दावा…
काँग्रेसच्या मतदारांचे क्रॉस व्होटिंग; भाजपच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय
‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया झळकणार आता वेब सिरीजमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

