मुंबई : राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून याआधी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
असाच एकप्रकार खेड (राजगुरूनगर) येथे घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर पंचायत समितीचे सदस्य आपल्या बाजूने करून घेतले होते, असा आरोप करत स्थानिक शिवसेना नेते हे तीव्र नाराज होते. आता हे प्रकरण वाढलं असून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
त्यांच्या आदेशानुसार आज शिवसेना खासदार व नेते संजय राऊत हे खेडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची बाजू समजावून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली असून संजय राऊतांच्या विधानांनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकार अंतर्गत मतभेदांनीच कोसळेल हे विधान केलं आहे.
‘आमच्या अजेंड्यावर सध्या कोरोना घालवणं हे आहे. आमच्या अजेंड्यावर आता सरकार पाडणं नाहीये. ज्या प्रकारे मी पहिल्याच दिवशी सांगितलंय, जे सध्या घडतंय, हे सरकार अंतर्गत विरोधानेच पडेल. तेव्हा हे खरं वाटत नव्हतं. मात्र आता अंतर्विरोधाचा बोजा लोकांना जाणवायला लागलाय. समन्वयाचा अभाव आता जाणवतोय. ही तीन चाकांची रिक्षा असून तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला जातायत. आमच्याकडे भरपूर संयम आहे. आम्ही विरोधी पक्षाचं, जनतेची गाऱ्हाणी मांडायचं काम बिनचूक पडेल. आम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नसून हे सरकार आपल्या वजनानेच कोसळेल.’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक केल्यास गय केली जाणार नाही’
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- नारायण राणेंनी संभाजीराजेंवर केलेली टीका योग्य नाही – फडणवीस


