🕒 1 min read
अहमदनगर : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपसोबत दोन दशकांहून अधिक काळ असलेली मैत्री तोडली. यानंतर, शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. तर, सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे.
महाविकास आघाडी आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता त्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसह इतर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये देखील होत आहे. कुठे या तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव आहे तर कुठे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र युती करून लढतील असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं होतं. आता सेना-राष्ट्रवादीच्या युतीची नांदी नगरमधून होताना दिसतीये.
काय आहे अहमदनगर महापालिकेच्या सत्तेचं गणित ?
अहमदनगर महापालिकेत सध्या राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भाजपचा महापौर आहे. त्यांची मुदत ३० जूनला संपत आहे. अशात भाजपकडे उमेदवार नसून शिवसेनेनं आणि काँग्रेसने याआधीच आपला उमेदवार जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची मानली जात आहे. कारण महापालिकेत शिवसेना २३, राष्ट्रवादी १९, भाजप १५, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ असे पक्षीय बलाबल आहे. तर एक जागा रिक्त आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद आहे. याचा फायदा भाजपला झाला होता.
भाजपकडे अपात्र उमेदवारच नसल्याने महापौरपदाच्या शर्यतीतून ते बाद ठरले आहेत. तर, आता ३० जून रोजी ऑनलाईनपद्धतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत या युतीची समीकरणं जुळली होती.
महापौरपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला असून उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. आज महापौरपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसला दूर ठेवण्यात आलं असून स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीतील बिघाडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जनतेतील असंतोषाला घाबरून आघाडी सरकार तिसऱ्या लाटेची दहशत पसरवतंय’
- ‘वाघ आमच्या इशाऱ्यावर सरपटतो, असंही चाललं असतं’; भातखळकरांचा शिवसेनेला टोला
- माजी मंत्री शिवतारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; पुरंदरच्या कॉंग्रेस आमदारावर केला गंभीर आरोप
- ओबीसी समाजाचे सर्व मंत्री एकत्र येतात, मग मराठा समाजाचे मंत्री एकजूट का दाखवत नाहीत ?
- देशात पहिल्यांदा ड्रोनने अतिरेकी हल्ला, जम्मू एअरबेसवर दोन बॉम्बस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
