मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. या ट्विटसोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही सचिनने वापरले आहेत. त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली.
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी याबाबत भाष्य केले आहे. ‘सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवण्यासाठी सोशल मीडिया वापरला जातो. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसद परिसरात धुडगूस घातला. त्यावेळी तिथल्या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याबद्दल आपण बोलतच होतो. तिथे झालेल्या घटनांचा आपण निषेध केला होता, असे म्हणत मातोंडकर यांनी अमेरिकेतील अंतर्गत मुद्द्याची आठवण करून दिली आहे.
‘अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पायउतार होण्यास नकार दिला होता. त्यांच्या समर्थकांनी संसद परिसरात गोंधळ घातला. संसदेचं नुकसान केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. तोच धागा पकडत आपणही अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नावर बोललो होतो. आपण तिथल्या हिंसाचाराचा निषेध केला होता’, असे म्हणत शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगणाऱ्या सेलिब्रिटींना मातोंडकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली’
- भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश

