कोल्हापूर : तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त असून मागील अधिवेशनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीच अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. आता पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आलं असून पुन्हा एकदा अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
संविधानिक बाबीनुसार अध्यक्षपदाची निवड तात्काळ करणे गरजेचे असते, मात्र या सरकारने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून अध्यक्षपद अद्यापही रिक्त ठेवल्याची टीका भाजपने केली होती. तर, या पावसाळी अधिवेशनातच अध्यक्षांची निवड केली जाईल असं महाविकास आघाडीतील काही नेते बोलत आहेत. अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये काही काळ तणाव निर्माण झाल्याचं याआधी पाहायला मिळालं होतं. त्यामुळेच महाविकास आघडी सावध भूमिका घेत असल्याच दिसून येत आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक याच अधिवेशनात होणार असल्याचं काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगितलं असून आता कामकाज काळात हजर राहण्यासाठी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. यामुळे महाविकास आघाडीतील हालचाली सध्या वाढल्या असून विधानसभा अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे मात्र अजूनही गुपित आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘विधानसभा अध्यक्षपदाची जागा ही काँग्रेसचीच जागा आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो तिनही पक्षांनी एकत्र मिळून घ्यावा आणि त्या पदासाठी योग्य तो उमेदवार त्यांनी निवडावा,’ असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे अध्यक्षपद काँग्रेसकडेच असणार हे देखील स्पष्ट होत असलं तरी उमेदवार ठरवण्यात तिन्ही पक्षांची महत्वाची भूमिका असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- ‘विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आणि अध्यक्ष काँग्रेसचाच असणार’
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा


