मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आधीच्या सरकारच्या निर्णयांना बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे का? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. कारण नव्याने आलेल्या या सरकारनं कालच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेट्रो कारशेडचा निर्णय बदलला आहे. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत होणारे आरोप प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळले आहेत.
नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत भारतीय कुस्ती संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यामध्ये कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात अॅड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह बाकी निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान या चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी टीव्ही ९ रतवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, “मी अनेक वर्षापासून विविध खेळांच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. खेळाडुंच्या निवडीत मी लक्ष घालत नाही, त्या त्या खेळातील जाणकार व्यक्ती त्यात लक्ष देतात. मी त्यांना काही अडचणी आल्या तर मी त्यांना मदत करीत असतो. शासकीय मदत हवी असल्यास त्यांना मदत करतो. कुस्तीगीर परिषदेतही मी हे काम करीत आहे. कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी भारतीय कुस्तीगीर संघटनेकडे आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद रद्द केली ,”
शरद पवार पुढे म्हणाले की, “पुण्यातील परिषदेच्या संघाकडून लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. मी त्यांना याबाबत समजून सांगितले, सुधारणा करण्यास सांगितले होते. पुण्यातील हिंदकेसरी काका पवार यांचीही तक्रार आली होती, या तक्रारी भारतीय कुस्तीगीर संघटनेकडे गेल्या होत्या. ते कडक कारवाई करतील, असे वाटलं होते. ही झालेली कारवाई चांगली नाही. दिल्लीतील संघटनेच्या अध्यक्षांना भेटून दुरुस्त्या केल्या जातील, भारतीय कुस्तीगीर संघटना मदत करेल,”
“खेळांच्या संघटनेत मी कधीही राजकारण आणत नाही, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली याचा महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंध नाही,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर राज्य परिषद बरखास्त करण्यामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र याच पक्षाचे इतर नेते मात्र या निर्णयाचा संबंध भाजपशी जोडताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद रद्द करण्यामागचे नेमके कारण काय आहे हे समजलेले नाही.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

