जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील मुदत संपणाऱ्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारीला या निवडणुकांचं मतदान होणार असून आता राजकीय वातावरण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी पक्षांच्या पुरस्कृत पॅनल्समध्ये चढाओढ चांगलीच रंगणार आहे. मराठवाड्यात देखील आता नेत्यांनी कंबर कसल्याच दिसून येत आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना खुलं आव्हान दिलं आहे.
जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा पण त्यांनी केल्याने आता ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. दरम्यान, ‘राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे’ असं म्हणत सत्तारांनी शड्डू ठोकला आहे.
सत्तारांच्या या टीकेला भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अब्दुल सत्तार हे युतीतून निवडून आले आहेत. याचं त्यांनी भान ठेवावं. रावसाहेब दानवे यांचं काम मोठं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केलं आहे. अनेक वर्षांपासून ते निवडून येत आहेत. त्यांना पराभूत करणं तेवढं सोप नाही. त्यामुळे सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आणखी टोप्या लागत असतील तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू,’ असा टोला महाजनांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेतुन लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फक्त एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी झाले जमा
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- ‘शेतकऱ्यांनी फुलेंचा “असुड” उगारला तर महाराष्ट्रात भाजपाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही’
- आमच्या नेत्यावर टिका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या : राष्ट्रवादी
- ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४३ हजारांची अवैध दारु जप्त


