पुणे : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आजच राऊतांनी पुणे महापालिकेवर भगवा फडकवणारच अशी घोषणा केली. तसंच त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर पुन्हा जोरदार टीका केली. परंतु या सगळ्या गोष्टींपेक्षा संजय राऊत आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या भेटीची चर्चा सर्वाधिक लक्षणीय ठरली. या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या प्रश्नावरुन पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी वेगळा सूर आळवल्यानंतर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली. पुणे शहर अध्यक्ष पदावरुन त्यांना हटविण्यात आलं होतं. यानंतर अनेक वेळा वसंत मोरे यांनी आपली नाराज उघड केली. दुसरीकडे वसंत मोरे यांनी पक्षातिल काही नेत्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. आपल्याला मनसेच्या सभेत भाषण करू दिले नाही, अशी खदखद ही त्यांनी व्यक्त केली. पक्षात डावललं जात असल्याचा आरोपही मोरे यांनी केला आहे.
अशातच आज संजय राऊत पुण्यात असताना वसंत मोरे आणि राऊतांच्या अनौपचारीक भेट झाली. या भेटीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. पुण्यात एका लग्नसमारंभात संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. याच सोहळ्यात वसंत मोरे देखील उपस्थित होते. दोघंही एकमेकांसमोर आले, संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना तात्या नावानं ओळखलं. यावेळी संजय राऊत यांनी वसंत मोरे यांची गळाभेट घेतली. ते करत असलेल्या कामाची प्रशंसा केली. ठाण्यातील तुमचं भाषण ऐकल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी वसंत मोरे यांना आवर्जून सांगितलं.
“तात्या तुम्ही चांगलं काम करत आहात”, असं संजय राऊत वसंत मोरेंना म्हणाले. जाता जाता संजय राऊत यांनी ‘भेटू’ असं म्हणत सूचक विधान केलं. त्यामुळे राऊतांनी वसंत मोरेंना शिवसेनेत येण्याची ऑफर तर दिली नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


