🕒 1 min read
मुंबई: नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने अल्पमतात असलेल्या ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करणे किंवा त्यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शपथविधी झाला आहे. अजून शिंदे सरकारने मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर फिल्मी स्टाईल टीका केली आहे.
महाराष्ट्रात सध्या असलेले फडणवीस-शिंदे हे दोघांचेच सरकार व दोघांचेच मंत्रिमंडळ हा एक अनोखा प्रयोग म्हणायला हरकत नाही. राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे. पंगत मांडलीय, मांडव सजलाय, पण बँडबाजा वरात रस्त्यात अडकलीय. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर करण्यावर रोक लावणे, ठाकरे सरकारचे लोककल्याणकारी निर्णय थांबवणे, आरेचे जंगल नष्ट करणे असले प्रकार केले जात आहेत. या ‘प्रेमरोगा’ने वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय व्हायचे ते होईल, पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेडेवाकडे घडवू पाहणार असतील तर ते सहन करता येणार नाही. महाराष्ट्रावर धोक्याची गिधाडे फडफडत आहेत, पण महाराष्ट्र नाउमेद होणार नाही, लढत राहील! असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अधिकारावर आहेत, पण ज्याला सरकार म्हणावे अशी व्यवस्था पंधरा दिवसांनंतरही निर्माण होऊ शकली नाही. फडणवीस म्हणतात, ‘महाराष्ट्रात कुणीही ‘सुपर सीएम’ नाही. शिंदे हेच सगळ्यांचे नेते’. अर्थात या सगळ्यांच्या नेत्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात टांगणीला लागले आहे. फडणवीस-शिंदे सरकारच्या असंख्य गमती-जमतींची चेष्टा होऊ लागली आहे. त्या गमती-जमतींचेही अजीर्ण होऊ लागले आहे. ठाकरे सरकारने घेतलेले काही निर्णय ‘असंविधानिक’ असल्याचे सांगून त्या निर्णयांना स्थगिती देण्याचे पोरखेळ सुरू झाले आहेत,” असा टोला सामनातून लगावला आहे.
ठाकरे सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर केला. या प्रस्तावांना फडणवीस-शिंदे सरकारने ‘बेकायदेशीर’ वगैरे ठरवून स्थगिती दिली व लोकांनी याबाबत धारेवर धरताच पुन्हा एकदा हे प्रस्ताव मंजूर केले. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव सध्याचे दोन स्तंभी सरकार कोणत्या आधारावर बेकायदेशीर मानतेय? ठाकरे सरकारने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला तेव्हा सरकारकडे बहुमत होतेच. शिंदे गटात बेडूकउड्या मारून पोहोचलेले काही मंत्रीसुद्धा त्या बैठकीत हजर होते. मंत्रिमंडळात हे ठराव एकमताने मंजूर झाल्यावरही विद्यमान सरकारला पोटदुखीने ग्रासावे हीच गंमत आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs ENG : ऋषभ पंतचा शतकी तडाखा अन् हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी; भारताचा ५ गडी राखून विजय
- IND vs ENG : हार्दिक पंड्याच बेस्ट! दमदार बॉलिंगमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव
- PV Sindhu : पीव्ही सिंधूच्या बलाढ्य यशानंतर पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
- IND vs ENG : भारतासमोर २५९ धावांचे लक्ष्य, विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा
- Sandipanrao Bhumre | एकनाथ शिंदेंसमोर संदीपान भुमरे म्हणाले… ” मी मुख्यमंत्री झालो”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
