Share

“एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे आणि…”, केंद्रीय अर्थसंकल्पाहून संजय राऊतांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी(१ फेब्रु.) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’वर केंद्रीय अर्थसंकल्पात सवलतींचा पाऊस पाडला म्हणून कोणाला वाईट वाटायचे कारण नाही. पण एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे, खिसा फाटेपर्यंत द्यायचे आणि दुसऱ्याचे जे हक्काचे आहे ते सुद्धा काढून घ्यायचे हा न्याय नाही, असे म्हणत टीका केली आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘केंद्रीय अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला सोडा, पण मुंबईला काय दिले या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. देशाच्या तिजोरीत मुंबई दरवर्षी सवादोन लाख कोटींची भर टाकते. सवादोन लाख कोटी म्हणजे चणेफुटाणे नाहीत. देशाचा डौल मुंबईच्या पैशांवरच उभा आहे, पण मुंबईला ओरबाडून इतरांची शहरे सोन्याने मढवायची हे असे प्रकार नव्याने सुरू आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात ‘गुजरात गिफ्ट सिटी’वर सवलतींचा नुसता वर्षाव झाला आहे. मुंबईचे घ्यायचे व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसायची. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने मुंबईशी जो उभा दावा मांडला आहे तो कशासाठी? केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईस तसे काहीच मिळाले नाही. याबाबत भाजपच्या तीन मुंबईकर खासदारांनी दुःखही व्यक्त करू नये? सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा, आत्मनिर्भर करणारा, अर्थव्यवस्थेस गती देणारा वगैरे वगैरे, असे मत मुंबईकर भाजप खासदार व्यक्त करतात, पण अर्थव्यवस्थेस गती देण्याचे काम ज्या मुंबईतून होत असते त्या गतिमान मुंबईस नक्की काय मिळाले? मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील एखाद्या योजनेस गती देण्याचे सोडाच, पण आहे तेसुद्धा कसे ओरबाडता येईल याचेच प्रात्यक्षिक कालच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. पुन्हा एरवी छोटय़ा गोष्टींवरही मुंबई भाजपची मंडळी ‘टिवटिव’ करतात, पण केंद्रीय अर्थसंकल्पाने मुंबई-महाराष्ट्रावर जो अन्याय केला आहे त्याबाबत त्यांनीही ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवणेच पसंत केले.’

पुढे ते म्हणाले की,‘गुजरातमधील गांधीनगरचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आणखी सक्षम करण्यावर मोदी सरकारचा नेहमीच भर राहिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या ‘गिफ्ट सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे गेली पाच वर्षे मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रालाही आता ‘गिफ्ट सिटी’शी स्पर्धा करणे भाग पडणार आहे. गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’वर केंद्रीय अर्थसंकल्पात सवलतींचा, पैशांचा पाऊस पाडला म्हणून कोणाला वाईट वाटायचे कारण नाही. गुजरात आणि महाराष्ट्र ही जुळी भावंडेच आहेत, पण एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे, खिसा फाटेपर्यंत द्यायचे आणि दुसऱयाचे जे हक्काचे आहे तेसुद्धा काढून घ्यायचे हा न्याय नाही. मुंबईवरच अन्याय का? मुंबई-महाराष्ट्रातील अनेक उद्योग, आर्थिक व्यवहाराची केंद्रे गुजरातला नेण्यात आली. आता फक्त मुंबई केंद्रशासित करण्याचेच काय ते बाकी आहे.’

दरम्यान, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात काँगेस पक्षाला जे करता आले नाही ते आताची मोदी राजवट करू पाहत आहे काय? पारिजातकाचे झाड मुंबईत, पण फुलांचा सडा पडतोय बाजूच्या राज्यात. या झाडास खतपाणी घालायचे, मशागत करायची महाराष्ट्राने, पण फायदा घ्यायचा इतरांनी, हा उपक्रम गेली पन्नास-पंचावन्न वर्षे सुरू आहे. मुंबई ही देशाची औद्योगिक नगरी आहे, आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र आहे. हे आर्थिक केंद्र मुंबईऐवजी अहमदाबाद-गांधीनगरात व्हावे व त्यासाठी खटाटोप करावा हे ठीक, पण मुंबईला ‘बूच’ लावून हे आर्थिक केंद्र उभारणे हा राष्ट्रीय अपराध आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!