🕒 1 min read
मुंबई : जयपूर येथे महागाई विरोधात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भाजपच्या हिंदुत्वादाच्या मुद्यावर टीका केली. यावेळी त्यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादामधील फरक सांगितला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’कधी काळी देशात मुसलमान , दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे. भाजप त्याचेच ‘खात’ आहे. अशा परिस्थितीत विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला आहे. गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करून त्यांनी चर्चा सुरू केली. हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे ते म्हणाले,पण देश हिंदूंचा आहे हा विचार त्यांनी पुन्हा घासून पुसून वर आणला आहे. घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच आहे.’
पुढे ते म्हणाले की,’हिंदू संस्कृती ही सहिष्णू आहे, पण षंढ नाही, हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी रुजविला व लोळागोळा पडलेला हिंदू समाज जागृत झाला. १९४७ साली धर्माच्या नावावर हिंदुस्थानची फाळणी झाली. मुसलमानांसाठी त्यांचे हक्काचे पाकिस्तान निर्माण झाले. तेव्हा राहिलेला देश हा हिंदूंचाच आणि हिंदूंसाठी, असे मानले तर काय चुकले? पण पहिल्यापासून निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंना सावत्रपणाचीच वागणूक त्यांच्या देशात मिळाली. हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्कही नाकारले गेले. शंकराचार्यांपेक्षा जामा मशिदीच्या इमामांशी सलगी करण्यातच सेक्युलरवाद्यांना धन्य धन्य वाटू लागले. रामापेक्षा बाबरभक्तीत राज्यकर्ते लीन झाल्यावर लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला व काँग्रेस त्यात होरपळून निघाली. हे सत्य नाकारता येत नाही. शाहबानो प्रकरणात काँग्रेसने पीडित मुसलमान महिलेचा हक्क डावलला व शरियतमध्ये न्यायालयाने ढवळाढवळ केली हे मान्य करून घटनादुरुस्ती केली. हे काही लोकांना पटले नाही, पण मोदी सरकारने बिनधास्तपणे तीन तलाक विरोधी कायदा करून पीडित मुसलमान महिलांना दिलासा दिला. असे धाडसी निर्णय घेताना हिंदू किंवा मुसलमान पाहायचे नसते. धर्माच्या वर देश आहे. सक्तीचे कुटुंब नियोजन, समान नागरी कायदा हे आता राष्ट्रहिताचे व राष्ट्रवादाचेच विषय बनले आहेत. त्यावर भूमिका घ्यावीच लागेल.’
दरम्यान, महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीचे रक्षक होते. त्यांनी जागोजाग मंदिरांचीच उभारणी केली. त्यात त्यांना धार्मिक अध्यात्मवाद दिसला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी धार्मिक उत्सव साजरे केले. शिवजयंती व गणपती उत्सव त्यांनी घरांतून सार्वजनिक जागी आणले. देशातील हिंदूंना डावलून कोणताही लढा निर्माण करता येणार नाही व पुढे नेता येणार नाही हे काँग्रेसच्या पूर्वजांनी जाणले होते. पण स्वातंत्र्यानंतर फालतू निधर्मीवादाचा जन्म झाला व हिंदूंना आपल्याच देशात असहाय्य वाटू लागले. हिंदू समाजाच्या मनात काँग्रेसविषयी एक अढी निर्माण झाली. काँग्रेसला फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांचेच पडले आहे. अल्पसंख्याकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा समज लोकांत आजही घट्ट रुजला आहे. तो दूर करावा लागेल. उत्तर प्रदेशसारख्या बलाढय़ राज्यांत प्रियंका गांधी यांनी एक नवा डाव टाकला आहे, पण येथील मुसलमान व दलित अखिलेश यादव, मायावतींना साथ देतो तर उच्चवर्णीय भाजपच्या हिंदुत्ववादाच्या थाळ्या वाजवतो ही वस्तुस्थिती आहेच, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- …हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे- संजय राऊत
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
