मुंबई : जयपूर येथे महागाई विरोधात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भाजपच्या हिंदुत्वादाच्या मुद्यावर टीका केली. यावेळी त्यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादामधील फरक सांगितला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’कधी काळी देशात मुसलमान , दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे. भाजप त्याचेच ‘खात’ आहे. अशा परिस्थितीत विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला आहे. गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करून त्यांनी चर्चा सुरू केली. हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे ते म्हणाले,पण देश हिंदूंचा आहे हा विचार त्यांनी पुन्हा घासून पुसून वर आणला आहे. घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच आहे.’
पुढे ते म्हणाले की,’हिंदू आणि हिंदुत्व याबाबत त्यांनी शब्दच्छल केला आहे. तरीही देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाला साद घालण्याची भूमिका अनेक वर्षांनंतर काँग्रेसने घेतली. निधर्मीवाद म्हणजे फालतू सेक्युलरवादाच्या फंदात व छंदात अडकून पडलेल्या काँग्रेसला राहुल गांधींनी नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची आजची अवस्था गावातल्या जमीनदारी गेलेल्या पडक्या भग्न वाडय़ासारखी झाली असल्याचे विश्लेषण शरद पवारांसारख्या नेत्यांनी केले, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. मुस्लिम व दलित मतांची घसघशीत रोकडा पेढी हेच त्या जमीनदारीचे फळ होते. याच मुसलमान – दलितांच्या ‘रोकडा’मुळे काँग्रेसचा वाडा चिरेबंदी तसेच वैभवशाली वाटत होता. आज ही दोन्ही खणखणीत नाणी काँग्रेसच्या मुठीतून सुटली व उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, प. बंगालसारख्या मोठय़ा राज्यांतून काँग्रेसची घसरण झाली. मुंबई-महाराष्ट्रातला मुसलमान बिनधास्तपणे शिवसेनेला मतदान करतो. मुस्लिमांच्या मतांसाठी फालतू लांगूलचालन न करणाऱ्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने आपले मानावे हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे.’
दरम्यान, सेक्युलरवाद म्हणजे हिंदूंना लाथा व मुसलमानांचे ऊठसूट लांगूलचालन ही भूमिका योग्य नसून हा देश सगळय़ांचा आहे. या देशाचा धर्म हिंदू आहे, पण येथे सर्व धर्म गुण्यागोविंदाने देशाचे नागरिक म्हणून राहू शकतात. मातृभूमीला वंदन करणारा, देशासाठी त्यागास तत्पर असलेला मुसलमान हा भारतमातेचाच पुत्र आहे हा विचार म्हणजेच राष्ट्रवाद आणि निधर्मीवाद. शिवसेनेने हिंदुत्व म्हणून याच विचारांची कास धरली. ‘महागाई वाढली आहे, जगणे मुश्किल झाले आहे, काहीतरी करा,’ असे जनता सांगते तेव्हा ‘महागाई वाढलीय. काळजी करू नका, राममंदिराची उभारणी झालीच आहे. आता मथुरेतील मंदिरांचे काम सुरू करतो,’अशी उत्तरे देणे हिंदू संस्कृतीत बसत नाही. सध्याची दिल्लीतील राजवट ही हिंदू संस्कृतीशी मेळ खात नाहीच, पण उद्धव ठाकरे ठणकावून सांगतात त्याप्रमाणे धोकादायक असे नकली हिंदुत्व ठासून भरलेली ती बुजगावणी आहेत. कोणी काय व कसे खायचे यावर दंगली घडवून झुंड बळी घेणे हिंदू संस्कृतीत बसत नाही. हे खरे असले तरी अन्न, वस्त्र, निवारा हे राज्यकर्त्यांचे आद्य कर्तव्यच आहे. जात, धर्म न पाहता प्रजेला हे सर्व पुरविणारा राजा हाच हिंदू संस्कृतीचा पाईक ठरतो’, असेही लेखात म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज


